जळगाव (प्रतिनिधी) उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (आरटीओ) बातम्या न प्रकाशित करण्यासाठी दरमहा खंडणीची मागणी करणाऱ्या धुळ्याच्या कथित पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नथ्यूभाऊ गुर्जर, असे संशयिताचे नाव आहे.
प्रादेशिक परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी याबाबत रामानंद पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धुळे येथील ‘दै. धुळे मैदान’ या डिजीटल माध्यमाचा पत्रकार तथा संपादक नथ्यूभाऊ गुर्जर याने आरटीओविभागाच्या कामकाजाबाबत उलटसुलट, तथ्यहिन बातम्या प्रकाशित न करण्याच्या मोबदल्यात २२ ऑगस्टला भेट घेऊन दरमहा १० हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली. त्यात तडजोड होऊन दरमहा ५ हजार रुपये देण्याचे लोही यांनी कबुल केले.
दरम्यान, या सर्व संवादाचे छायाचित्रण लोही यांनी आपल्या मोबाइलमध्ये करून घेतले होते. तसेच लोही यांनी रामानंदनगर पोलिसात लेखी तक्रार केली. मंगळवारी गुजर हा कार्यालयात पैसे स्वीकारण्यासाठी आला. लोही यांनी यांनी गुर्जर याला पाच हजार रुपये दिल्यानंतर ते घेऊन तो कार्यालयावर पडताच पंचांच्या समक्ष पोलिसांनी त्याची झडती घेऊन दिलेल्या रक्कमेसह घेऊन गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले हे करीत आहेत.