जळगाव (प्रतिनिधी) शतपावली करणाऱ्या वृद्धेची सोनपोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लांबविली. ही घटना गुलमोहर कॉलनीमध्ये साईबाबा मंदिराजवळ बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलमोहर कॉलनीमध्ये शिक्षणासाठी खोली घेऊन राहणाऱ्या नातवंडांकडे राहणाऱ्या लिलाबाई केशव पाटील (७७) या बुधवारी रात्री घराजवळच एका महिलेसह शतपावली करीत होत्या. त्या वेळी सेंट जोसेफ शाळेकडून दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यातील एकाने लीलाबाई पाटील यांच्या गळ्यातील जवळपास दोन तोळे वजनाची सोनपोत ओढून भरधाव वेगाने दुचाकी घेऊन पसार झाले. घटनेनंतर आजूबाजूचे रहिवाशी जमा झाले. याविषयी रामानंद नगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी लीलाबाई पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















