मुंबई (वृत्तसंस्था) अयोध्येतील राम मंदिराच्या नावानं भाजप व आरएसएस घरोघरी जाऊन रोख पैसे गोळा करत असून त्यांच्याकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे. हा पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा पक्षासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. भाजपा-आरएसएसनं गोळा केलेला निधी ट्रस्टला पोहोचला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.
सध्या राम मंदिर निर्मितीसाठी निधी संकलनाचे काम जोरात सुरु आहे. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सचिन सावंत म्हणाले की, राम मंदिर प्रक्रिया सुरू आहे. राम मंदिर निर्मितीकर्ता निधी संकलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात लोक सहभागी होत आहेत. पण ह्या कार्यक्रमात भाजप आणि RSS सहभाग चिंताजनक आहे. भाजपने राम मंदिर मुद्दा फक्त राजकारणासाठी वापरला आहे. राम मंदिर चंदा हा भाजपचं धंदा असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सावंत पुढे म्हणाले की, भाजप आणि RSSने निधी उभारताना जो पुढाकार घेतला आहे. यातून जनतेला लुबाडण्याची शक्यता आहे. भाविकांचे मेहनतीचे पैसे राम मंदिर निर्माण आणि ट्रस्टला जाईल याची जनतेने काळजी घ्यावी. रोखीने पैसे गोळा केला जातो त्यात अपहार होऊ शकतो. राज्य सरकारने राज्यातील भाविकांची लुबाडणूक होऊ नये यासाठी जो भाजपने किंवा आरएसएसने जो निधी संकलित केला असेल त्याची चौकशी व्हावी, असंही सावंत म्हणाले.
ते म्हणाले की, निर्मोही आखाडा यांनी आरोप केला होता विश्व हिंदू परिषदेने १४०० कोटी पैसे लुबाडले. अनेक क्विंटल सोने लुबाडले गेले. हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाकडे चौकशीची मागणी केली होती. २०१७ पासून चौकशी प्रलंबित आहे. ४ जानेवारी २०२१ रोजी हिंदू महासभेने भाजपने निधी गोळा करू नये असं म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भाजपला तिथे राम मंदिर कधीच नको होतं. गेल्या तीन दशकात भाजपने जमा केलेल्या पैशाचा हिशोब दिला नाही. राम मंदिर पैसे गोळा करण्याचे काम भाजपरुपी रावण करत आहे. हे हिंदू महासभा बोलत आहे. त्यांनी कोर्टात जायचा इशारा दिला आहे, असंही सावंत म्हणाले.
राम मंदिरासाठी भाजपकडून निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदू महासभेनं विरोध केला आहे. भाजपला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपसाठी हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. गेल्या तीन दशकामध्ये भाजपनं जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असं हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितलेलं आहे. निधीचा हिशेब सार्वजनिक न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही जोशी यांनी दिला आहे, याकडं सावंत यांनी लक्ष वेधलं.