जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी यापुढे विद्यापीठ प्राधिकरणाची कोणतीही निवडणूक न लढविण्याचा किंवा नामनिर्देशित सदस्य म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिलीप पाटील यांनी विद्यापीठ क्षेत्रातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक व पत्रकार यांचे आभार मानणाऱ्या पत्रात ऊल्लेख केला आहे की, विद्यापीठ स्थापनेसाठी आंदोलनात सहभाग घेतला. स्थापनेनंतर विद्यापीठाच्या विविध समित्यांमध्ये काम केले. राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्राधिकरण हे उपजिवीकेचे, पैसे कमविण्याचे साधन नाही तर विश्वस्त म्हणून तेथे काम करण्याची भूमिका घेतली. यामुळे ज्यांचा स्वार्थ दुखावला त्यांनी माझ्यावर काही आरोप केले. पण कर नाही त्याला डर कशाला या भावनेने काम केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करताना अनेक मागण्या मान्य कराव्यात म्हणून पूर्वी आग्रह करायचो, त्या मागण्यांबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होता आले.
३५ वर्षे विद्यापीठाशी जुळलेलो राहिलो. या दरम्यान सर्वांना सोबत घेऊन, कोणताही आपपर भाव मनात न ठेवता, राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन केवळ विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन काम करण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या गोष्टी घडू नयेत म्हणून सजग राहिलो. त्याचे परिणाम भोगावे लागले पण विचलीत झालो नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्कार आणि राजकीय विचार बाजूला ठेवून अनेकांनी केलेल्या सहकार्यामुळेच आजवरची वाटचाल करू शकलो, असल्याचेही दिलीप पाटील यांनी म्हटले आहे.