जळगाव प्रतिनिधी (दि.१७.०७.२०२५) – जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्था अंतर्गत विविध महाविद्यालये विनापरवानगी व अनधिकृतपणे सुरू बाब गंभीर असून यासंबंधी वैद्यकीय शिक्षण आयुक्त, वैद्यकीय संचालक, यांना तात्काळ चौकशीचे निर्देश देण्यात आले आहे. या संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात आली असून त्याबाबत विद्यापीठांना देखील निर्देश देण्यात येतील.
आठवडाभरात संस्थेची चौकशी करून योग्य कार्यवाही करू तसेच संस्थेने नियमबाह्य कागदपत्रे बनवले असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून गरज पडल्यास मोक्काप्रमाणे कारवाई करण्याचे देखील प्रस्तावित करण्यात येईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी आज रोजी विधानसभेत घोषणा केली.
जामनेर येथील जैन बहुउद्देशीय संस्था अंतर्गत अनेक वर्षापासून विविध शैक्षणिक संकुल उभारून शाळा, बीएड कॉलेज ,फार्मसी कॉलेज, ज्युनिअर कॉलेज , नर्सिंग कॉलेज सुरू असून या संस्थेच्या बेकायदेशीर कारभाराविषयी आमदार विजय शिवतारे यांनी आज महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चा सूचेनुसार ही मागणी विधानसभेत केली.
संस्थेने बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केले आहे तसेच शासनाचे विविध विभागाच्या देखील परवाना घेतलेला नाहीत. बनावट परवानग्या घेतल्या आहेत, शासनाचे बनावट कागदपत्र तयार केले आहेत. अनेक दाखले बनावट असून याद्वारे शासनाची दिशाभूल करण्यात असल्याचा मुद्दा आमदार शिवतारे यांनी यावेळी उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, यांनीही शासनाचे बनावट कागदपत्र तयार करणे एक प्रकारे देशद्रोह असल्याने या संस्थाविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी केली. आदिवासी समाजाचे विद्यार्थ्यांचे देखील विद्यार्थी संख्या जादाचे दाखवून तिथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न झाला आहे, यासंबंधी संस्थेची तात्काळ मान्यता रद्द करून शासनाचे घेतले अनुदान वसूल करण्यात यावे, संस्थेच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात यावे अशीही मागणी यावी आमदारांनी यावेळी केली. तसेच एखादी संस्था शासनाचे बनावट कागदपत्रे करून शासनाची दिशाभूल करत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असून कठोरात कठोर कारवाई संस्थेवर झाली पाहिजे जेणेकरून असा प्रकार अन्य संस्था कोणी करणार नाही, असाही मुद्दा यावेळी आमदार यांनी उपस्थित केला.
 
	    	
 
















