जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे सध्या त्यांनी मिळवलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे चर्चेत आहेत. या विषयासंदर्भात आता वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांनी, वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचा दावा केलाय.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी एकनाथराव खडसे यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाच्या तज्ञ डॉक्टरांनी खडसे यांना त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्यांच्या अहवालांच्या आधारेच ६० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यासाठी खडसेंनी स्वतः दिव्यांग मंडळात तपासणीसाठी हजेरी लावून त्यांच्याकडे असलेले तपासणी अहवाल सादर केले. त्याची प्रत्यक्ष पडताळणी करून दिव्यांग मंडळाच्या डॉक्टरांनी त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र इश्यू केले आहे, अशी माहिती डॉ. पोटे यांनी दिली आहे.
खडसे यांना सर्व्हायकल स्पॉंडिलिसिस तसेच नी-जॉईंट प्रॉब्लेममुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचेही डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले. तसे वैद्यकीय तपासणीचे अहवाल त्यांच्याकडे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांना दिलेले प्रमाणपत्र हे टेम्पररी बेसिसवर असून ते एका वर्षाच्या कालावधीसाठी लागू असेल. औषधोपचाराने पुढे त्यांचे अपंगत्व कमी होऊ शकते किंवा वाढू पण शकते. त्यावेळच्या वैद्यकीय तपासणीत काय निदान होते, त्यावर ही बाब अवलंबून असेल, असेही डॉ. पोटे म्हणाले.
एक हात किंवा पाय नसलेल्या अपंग व्यक्तीला देखील ६० टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही, मग खडसेंना ते कसे मिळाले? असाही एक आक्षेप आहे. त्याबाबत बोलताना डॉ. मारोती पोटे म्हणाले, खडसे यांना डायबेटीस, न्यूरोसेन्सेशन असे अनेक आजार आहेत. त्यांना वेळोवेळी डायलिसीस करावे लागते. क्रोनिकल न्यूरोलॉजिकल कंडिशनमुळे बऱ्याच जणांना अशा प्रकारचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे फक्त खडसेंना हे कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असेही डॉ. पोटे यांनी सांगितले. शासनाने २०१८ च्या शासन निर्णयानुसार २१ प्रकारच्या आजारांमध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक आजार त्यात समाविष्ट केले आहेत, असेही ते म्हणाले.