धरणगाव (प्रतिनिधी) येथील एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांची नियुक्ती होताच, त्यांच्याच कवितेचा चिकित्सक अभ्यास करून त्यांचा माजी विद्यार्थी ज्ञानसागर सूर्यवंशी याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एम. फिल.ची पदवी प्राप्त केली आणि ती गुरूंना अनोखी भेट म्हणून दिली.
पी.आर.हायस्कूलचा माजी विद्यार्थी ज्ञानसागर संतोष सूर्यवंशी याने ‘डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास ‘या विषयावर प्रा.डॉ.रामचंद्र झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला. काल विद्यापीठात झालेल्या मौखिक परीक्षेत (व्हायवा) तो पात्र ठरला आणि विद्यापीठाने त्याला एम. फिल. पदवी जाहिर केली.आज ज्ञानसागर याने ही अनोखी बौध्दिक भेट देऊन आपले गुरू डॉ. सोनवणे यांच्या प्रती आदर व्यक्त केला.यावेळी कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी आणि पत्रकार बी. आर. महाजन हे उपस्थित होते. ज्येष्ठ कवी तथा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य आणि डाॅ. कैलास अंभूरे यांनी ज्ञानसागरचा सत्कार केला. ज्ञानसागरला वडील संतोष सूर्यवंशी आणि वडील बंधू तथा पाचोरा येथील मानसिंगका महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन मिळाले.