यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील शिवथाळी केंद्रात शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी करणारं भयाण वास्तव समोर आलं आहे. या शिवभोजन केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी थाळी चक्क शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा संताप आणणरा प्रकार दाखवून देणारा एका शिवभोजन केंद्रावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार दाखवणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. गरिबांना कमी दरात चांगले जेवण मिळावे या हेतूने ठाकरे सरकारनं शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हा प्रकार पाहता सरकारच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. अशाप्रकारे शौचालयाच्या गलिच्छ जागेवर भांडी धुऊन त्याच थाळीत पुन्हा भोजन दिले जात असल्याने सरकार एक प्रकारे गरिबांची थट्टाच करत असल्याचे दिसून येत आहे. आता या शिवभोजन केंद्र चालकावर जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचे चौकशीचे आदेश
शिवभोजन योजना ही महाविकास आघाडी सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. हा नेमका काय प्रकार आहे या संदर्भात सखोल चौकशी करावी असे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला देण्यात आले आहेत. तसेच या संदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावा असेही आदेश देण्यात आले आहे.
















