जळगाव(प्रतिनिधी) : जळगाव मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असता या पदाधिकाऱ्यांनी त्यांची विमानतळावर भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनीदेखील सखोल चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.
बकाले यांनी केलेल्या वक्तव्याची ऑडिओ क्लीप महाराष्ट्रभर व्हायरल झाली असून, त्यामुळे मराठा समाज संतापलेला आहे. बकालेंविरुद्ध राज्यभर गुन्हे दाखल झालेले आहेत; मात्र त्यांना अद्यापही अटक झालेली नाही. निलंबनानंतर हजेरीसाठी जळगावात न बोलावता त्यांना नाशिकला उपअधीक्षकांकडे हजेरीचे आदेश काढण्यात आले. बकाले यांना स्थानिक पातळीवरून राजकीय व पोलीस दलाकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलेला आहे. शिष्टमंडळात मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील, राम पवार, विनोद देशमुख, सुरेंद्र पाटील, हिरामण चव्हाण, चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, रवी देशमुख, प्रमोद पाटील, राहुल पाटील, उल्हास पाटील, धनंजय पाटील, पीयूष पाटील, अन्नू पाटील, बापू बिन्हाडे, नितीन नन्नवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
















