पुणे (वृत्तसंस्था) आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकदिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या मार्गिकेचंही लोकार्पण केलं आहे. दरम्यान, यावेळी बोलत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपासून मोठ्या व्यक्तींकडून न शोभणारी वक्तव्य होत असल्याचे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खोचक टोला लगावला.
यावेळी अजित पवारांनी आज उद्घाटन झालेल्या पुण्यातील प्रकल्पावर समाधान व्यक्त केलं आहे. “पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे. १० जूनला पुणे महानगर पालिकेनं ठराव पास केला होता की आपल्याला मेट्रो हवी. त्यानंतर १२ वर्ष सुरू करायला लागली. मधल्या काळात काही लोकप्रतिनिधींच्या हट्टासाठी ती जमिनीवर करायची की अंडरग्राऊंड यामध्येच बराच वेळ गेला. पण नंतर गडकरींनी कठोर भूमिका स्वीकारली आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला. अजून काही काळ तो त्रास सहन करावा लागणार आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. “पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो”, असं अजित पवार म्हणाले.