नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी फेसबुक (facebook) आणि ट्विटरच्या (twitter) गैरवापरावरून आज सत्ताधाऱ्यांचं लोकसभेत लक्ष वेधलं. आज लोकसभेत दिग्गज सोशल मीडिया कंपन्यांवर सरकारशी संगनमत करून सामाजिक एकोपा बिघडवत असल्याचा आरोप केला.
सोनियांनी फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोप केला की, ते राजकीय पक्षांच्या नॅरेटिव्हला आकार देण्याचे काम करत आहेत. त्या म्हणाल्या की, जागतिक सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना समान संधी देत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. सोनिया गांधी म्हणाल्या की, वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात फेसबुकने सत्ताधारी पक्षाला कसा पाठिंबा दिला हे सांगितले होते. असेच दावे अनेक अहवालांमध्येही करण्यात आले होते. ज्यामध्ये फेसबुकने स्वतःचे नियम तोडून सत्ताधारी पक्ष आणि सरकारची बाजू घेतल्याचे सांगण्यात आले. चुकीच्या माहितीमुळे देशातील तरुण आणि वृद्धांमध्ये द्वेष भरण्याचे काम केले जात आहे. कंपनीला याची जाणीव असूनही त्याचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला जात आहे.
अशा कंपन्या भारतातील लोकशाही आणि सामाजिक एकोपा बिघडवण्याचे काम करत असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. आपण ते जतन करणे आवश्यक आहे. हे सर्व सरकारच्या संगनमताने होत असल्याचा आरोप सोनियांनी केला. याशिवाय त्यांनी कॉर्पोरेट नेक्ससच्या अहवालाचाही उल्लेख केला. सोनिया म्हणाल्या की, हे आपल्या देशासाठी आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.