जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषद सेस २०२५-२६ अंतर्गत दिव्यांग कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील कर्णबधीर विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त कर्णबधीर विद्यालयांमधील एकूण ३४६ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला असून, प्रत्येक विद्यार्थ्याला दोन्ही कानांसाठी मिळून ६९२ कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले. या योजनेसाठी सुमारे ५३ लाख रुपयांचा निधी विनियोजित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्णयंत्रांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता वाढवणे हा असून, यामुळे त्यांच्या संवाद कौशल्यात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. परिणामी शैक्षणिक अडचणी कमी होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाने सांगितले की, या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील आणि तांत्रिक साधनांच्या मदतीने त्यांचा आत्मविश्वास वाढून ते आत्मसन्मानाने प्रगती करू शकतील. समावेशक शिक्षणाचा ध्यास घेत जळगाव जिल्हा प्रशासन सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.















