जळगाव (प्रतिनिधी) हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे. त्यामुळे तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक ही वाढत आहे. सध्या धरणाचे ४ दरवाजे पूर्ण तर २ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले असून यातून २७ हजार ८२८ क्युसेक तर कालव्यातून १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. पूर्णा नदीचे पुर पाणी सायंकाळपर्यंत हतनूर धरणात पोहोचण्याची शक्यता असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडावा लागणार असल्याचे जळगाव पाटबंधारे विभागाने प्रशासनास कळविले आहे.
तरी तापी नदीकाठावरील गावातील सर्व नागरिकांनी सावध रहावे. नदी काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये, आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात जाणार नाहीत. तसेच नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, सामुग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील याची दक्षता घ्यावी. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात आल्यास त्वरीत प्रशासनास सूचित करावे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी कळविले आहे.