जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. यात आता पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाचा बळी ठरलेले भाजपचे माजी खासदार ए. टी. पाटील हे देखील ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
ए. टी. पाटील यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे सलग दोन टर्म प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०१९ मध्ये पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे त्यांची उमेदवारी पक्षाने कापली होती. याच कारणामुळे पाटील हे गेल्या 3 वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दुरावलेले होते. भाजपच्या व्यासपीठावर ते कुठेही दिसले नव्हते. मात्र, आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ते प्रकाशझोतात आले आहेत. विशेष म्हणजे, ते भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
पक्षापासून दुरावलेलो नाही
माजी खासदार ए. टी. पाटील हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक आहेत. मागच्या संचालक मंडळात ते भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून जिल्हा बँकेवर निवडून आले होते. आताही ते भाजपकडून ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तशी माहिती त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना दिली. मी भाजपात सक्रिय आहे. पक्षाचे काम करत असून, पक्षापासून दुरावलेलो नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.