जळगाव (प्रतिनिधी) भाजपा सारख्या जातीयवादी पक्षासोबत निवडणूक लढण्यास नकार देऊन काँग्रेसने जिल्हा बँकेतील सर्वपक्षीय पॅनलवर पाणी सोडले होते. त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या गोटातूनही सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपाला सोबत घेण्यावरून विरोध होत आहे. राष्ट्रवादीचे विनोद देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतचा आपला विरोध नोंदविला आहे.
राष्ट्रवादीचे विनोद देशमुख यांनी आज सकाळी सोशल मीडिया एक पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये त्यांनी कॉँग्रेसचा निर्णय योग्य वाटतोय. शेतकर्यांना चिरडणार्या पक्षासोबत शेतकर्यांच्या जिल्हा बँकेत – युती नको करायला असे वाटते. काँग्रेस प्रमाणेच राष्ट्रवादीने सर्वपक्षीय पॅनल मधून बाहेर पडावे, असे मला वाटते. भाजप सोबत कोणत्याही निवडणुकीस माझा नम्र विरोध, असं विनोद देशमुख यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टवर राष्ट्रवादी अर्बन सेलचे मनोज वाणी यांनी देखील प्रतिक्रिया देत असं झाल्यास राष्ट्रवादीचाच अध्यक्ष बनेल असे म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीतून ही सर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपाला सोबत घेण्यावरून विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवसभरात राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.