जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भुसावळ, पाचोरा व चाळीसगाव या तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांनी सर्वपक्षीय पॅनलवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, आज, सोमवारपासून १८ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीला पाहिजे असलेल्या काही जागा भाजपच्या खात्यात, तर भाजपला पाहिजे असलेल्या जागा राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे सर्वपक्षीय पॅनल झाले तरी काही जागांवर मतदान होण्याची शक्यता आहे.
असे आहे सर्वपक्षीय पॅनल
■ भाजप : संजय सावकारे (भुसावळ), गिरीश महाजन (जामनेर), नंदकुमार महाजन (रावेर), सुरेश भोळे (जळगाव), स्मिता वाघ (महिला राखीव), यावल व एनटी राखीव या मतदारसंघातील नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
■ राष्ट्रवादी काँग्रेस : संजय पवार (धरणगाव), अनिल पाटील (अमळनेर), एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे (मुक्ताईनगर), अॅड. रवींद्र पाटील (बोदवड), राजीव देशमुख किंवा प्रमोद पाटील (चाळीसगाव), डॉ. सतीश पाटील (ओबीसी), गुलाबराव देवकर (इतर सहकारी संस्था).
■ शिवसेना : चिमणराव पाटील (पारोळा), अमोल पाटील (एरंडोल), किशोर पाटील (पाचोरा), प्रताप पाटील (भडगाव), प्रा. चंद्रकांत सोनवणे (एससी, एसटी)
■काँग्रेस : डॉ. सुरेश पाटील (चोपडा), अरुणा पाटील (महिला राखीव).