औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरातील एका घटस्फोटित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी चार जणांनी तिच्यासोबत अत्याचाराचा कळस गाठला आहे. आरोपींनी पीडित महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित महिलेचे नग्नावस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. सुशील जगन्नाथ साध्ये (वय 31, रा. पुंडलिकनगर) आणि अजय विष्णू मुळे (वय 26, रा. रेणुकानगर, पहाडसिंगपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं जवाहरलाल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय पीडित महिला घटस्फोटित असून ती 2011 पासून आपल्या तेरा वर्षीय मुलीसह एकटी राहते. दरम्यान 2019 मध्ये पीडिता कार घेण्यासाठी एपीआय कॉर्नर येथील शोरूममध्ये गेली होती. त्यावेळी तिची ओळख आरोपी सुशील साध्ये याच्यासोबत झाली. त्यानं फायनान्सकडून कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली पीडितेकडून साडेतीन लाख रुपये घेतले. यानंतर 27 मे 2019 रोजी आरोपी सुशील साध्ये आपला मित्र अजय मुळे याला घेऊन पीडितेच्या घरी गेला.
यावेळी त्यानं लोन मंजूर झाल्याचं सांगत पीडित महिलेला पेढा खाऊ घातला. हा पेढा खाल्ल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली. पीडितेला शुद्ध आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. या प्रकारानंतर पीडितेनं आरोपीकडे आपले पैसे परत मागितले. आरोपीनं पाच लाखांचा चेक दिला पण तो वटला नाही. या घटनेनंतर आठ दिवसांनी आरोपी साध्ये आणि मुळे पुन्हा पीडितेच्या घरी आले. यावेळी त्यांनी मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीनं पीडित महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत अनेकदा अत्याचार केला.
दरम्यान, कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरल्याच्या कारणातून आरोपी लोहार आणि रामचंद्र पाटील या अन्य दोन आरोपींनी देखील पीडितेवर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पीडितेला एका ब्युटीपार्लरमध्ये घेऊन जात तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकरणी जवाहरलाल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
















