मेरठ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका कुटुंबाला घराच्या छतावर नोटा आणि दागिन्यांनी भरलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुळात ही नशिबाची देण नाही तर चोरानं केले उपद्व्याप आहेत. दोन दिवसांपूर्वी मेरठच्या मिशन कॉन्फरन्स क्षेत्रात ४० लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. बॅग मिळाल्यानंतर कुटुंबियांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली.
अधिक माहिती अशी की, घराच्या छतावर सापडलेल्या बॅगेतील दागिन्याव्यतिरिक्त १४ लाख रुपये रोकड मिळाले. या दागिन्यांची किंमत किती रुपयांचे आहेत याचे मूल्यमापन अजून व्हायचे आहे. याचा भागात दोन दिवसांपूर्वी गादीचा व्यवसाय करणाऱ्या पवन सिंहल यांच्या घरी चोरी झाली होती. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी बुधवारी सकाळी सिंघल यांचे शेजारी वरुण शर्मा यांच्या छतावर बॅग सापडली. वरुण यांनी सकाळी छतावर बॅग असलेली पाहिली. त्या बॅगेत नोटा असल्याचे त्यांना आढळले. त्यांना हा चोरीचा माल असल्याचा संशय आला आणि त्यानंतर त्यांनी ही गोष्ट पोलिसांना सांगण्याचा निर्णय घेतला. चोरी केल्यानंतर चोरांनी घराच्या छतावर बॅगा ठेवल्या असतील. काही वेळाने त्या नेता येतील या उद्देशाने चोराने चोरीच्या बॅगा ठेवल्या असतील, असे वरुण शर्मा यांनी सांगितले.