जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक मूल्यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या माजी नगरसेविका अश्विनी विनोद देशमुख यांना नेल्सन मंडेला अॅकॅडमी द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकाकडून डॉक्टरेट (सोशल सायन्स) पदवी व नेल्सन मंडेला नोबेल पीस अॅवॉर्ड २०२१ मिळाल्याने आज महापौर जयश्री महाजन यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित केले.
शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे यावेळी उपस्थित होत्या. अश्विनी देशमुख यांनी केलेल्या कचराकुंडी मुक्त वार्ड, ब्लॅक आऊट, किचन वेस्टमधून खतनिर्मिती तसेच नगरसेविका म्हणून जळगाव शहर महानगरपालिका सभागृहात वेळोवेळी केलेली लक्षवेधी कामगिरी याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट व अॅवॉर्ड देऊन संबंधित विद्यापीठातर्फे सन्मानित करण्यात आले. हा सोहळा पुणे येथील कोरिंथिअंस क्लब अॅण्ड रिसोर्टमधील हॉलमध्ये संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू तथा प्रायमिनिस्टर वेल्फेअर स्कीमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रल्हाद मोदी, तसेच ऑक्सफर्ड पार्लमेंट ऑफ वर्ल्ड चेअरमन तथा चीफ डायरेक्टर प्रो.मधु क्रिष्णन, बोस्नियाचे राजदूत सुहास मंत्री, नेल्सन मंडेला अॅकॅडमी ऑफ अमेरिका-भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार टाक, व्हा.प्रेसिडेंट विजयसिंह पाटील, गव्हर्नर कन्वेअर बंडू वाघ यांच्यासह देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. अश्विनी देशमुखांची कामगिरी निश्चितपणे कौतुकास्पद असून जळगावसाठी अभिमानास्पद असल्याचे महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी सन्मानावेळी सांगितले.