उदयपूर (वृत्तसंस्था) अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भगवान श्री रामांच्या भव्य मंदिरासाठी निधी संकलन सुरू आहे. दरम्यान, सर्वात मोठे दान उदयपूरच्या अरविंद सिंघल यांनी दिले आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांचे लहान भाऊ अरविंद सिंघल यांनी मंदिर निर्माणासाठी ११ कोटी रुपये दिेले आहेत. अरविंद यावेळी म्हणाले की, मोठ्या भावाचं राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे.
विश्व हिंदू परिषदेने केलेल्या राम मंदिर आंदोलनात अशोक सिंघल यांची मोठी भूमिका होती. त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी अनेक आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. अरविंद सिंघल यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी उदयपूरमध्ये दान जमा करीत असलेले पारस सिंघवी यांना दोन वेळा चेकच्या माध्यमातून ११ कोटी रुपयांचा निधी दिला. पहिल्या टप्प्यात त्यांनी पाच कोटी आणि नंतर ६ कोटी रुपयांचा चेक दिला. सिंघवी यांनी सांगितलं की, राजस्थानमध्ये सिंघल कुटुंबाकडून देण्यात आलेलं दान आतापर्यंत राज्यातील सर्वात मोठी रक्कम आहे.
मंदिराच्या भूमी पूजनादरम्यान उपस्थित होते सिंघल
सिंघल कुटुंबीय राजस्थानमधील उदयपूर भागात राहतात. अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनादरम्यान सिंघल कुटुंबातील सदस्य सलिल सिंघल उपस्थित होते. अशोक सिंघल यांनी राम मंदिरासाठी आंदोलन पुकारलं होतं, ते पाहता राम मंदिर ट्रस्टने या कुटुंबाला आमंत्रण पाठवलं होतं. त्यावेळी अरविंद सिंघल आजारी होते. त्यामुळे त्यांनी सलिल यांना पाठवलं.