मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेने आज आपल्या सामना अग्रलेखातुन पाकिस्तान वर निशाणा साधला आहे. खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका आणि चीनच्या दारात जावे लागत आहे. त्यात गव्हाच्या टंचाईचे अभूतपूर्व संकट पाकिस्तानसमोर उभे ठाकले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्तानने का करावे, हा प्रश्न उरतोच! अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.
‘खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा’, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आपला शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. भारतासाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानातील घटना, घडामोडींकडे कितीही डोळेझाक करायची म्हटली तरी दाराजवळचा शेजार म्हणून पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या आणि तेथील बऱ्यावाईट गोष्टींकडे नजर ठेवावीच लागते. कमालीचे दारिद्रय़, भुकेकंगाल जनता, महागाईचा आगडोंब, कर्जात आकंठ बुडालेला देश आणि जर्जर झालेली अर्थव्यवस्था हे पाकिस्तानचे वास्तवदर्शी रूप आहे. मात्र तरीही ‘आम्ही अण्वस्त्रसज्ज देश आहोत’ असा तोरा हा देश कायम मिरवत असतो. पाकिस्तानचा हा दिमाख बेगडी आहे हे आता जगापासून लपून राहिलेले नाही, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
पाकिस्तानातून येणाऱ्या ताज्या बातमीने तर अब्रूची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत. पाकिस्तानची तिजोरी तर रिकामी आहेच, पण आता धान्याचे कोठारही जवळपास रिकामे झाले आहे. पाकिस्तानात अन्नामध्ये गव्हाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. मात्र पाकिस्तानच्या विविध प्रांतांतील गव्हाचे साठे संपुष्टात आले आहेत. जेमतेम तीन आठवडे पुरेल एवढाच गहू निवडक गोदामांमध्ये शिल्लक आहे. तीन आठवडय़ांनंतर खायचे काय, असा गंभीर प्रश्न पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारपुढे निर्माण झाला आहे, असेही यात म्हटले आहे.
पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला तातडीने ६० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा करण्याची तातडीची गरज आहे. अन्नधान्याचे मूल्यनियंत्रण करणाऱ्या समितीच्या बैठकीत बोलताना अर्थमंत्री तरीन यांनी एकूणच गव्हाचे उत्पादन आणि गोदामांतील साठवणूक याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली. मागच्या आठवडय़ात पाकिस्तानकडे ६,४७,६८७ मेट्रिक टन एवढाच साठा शिल्लक होता. मात्र पाकिस्तानी नागरिकांकडून होणारी गव्हाची विद्यमान खरेदी पाहता हा साठा आणखी घटून ३,८४,००० मेट्रिक टन इतका खाली घसरेल. त्यानंतरच्या एक-दोन आठवडय़ांत गव्हाच्या टंचाईचे मोठे संकट पाकिस्तानवर कोसळेल, असे एकंदरीत चित्र आहे. असे शिवसेनेने म्हंटल.