औरंगाबाद (वृत्तसंस्था) उद्या म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण आहे. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही हिंदू धर्मात वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र औरंगाबादेत वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज पुरुष मंडळींनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. “पुढचे सात जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको,” अशा घोषणा देत औरंगाबादमध्ये पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घालून पिंपळाची पूजा केली.
अनेक वर्षांपासून जे पुरुष पत्नीपासून पीडित आहेत. आपल्याला कोणीही मदत करतनाही दिसत नाही. त्यामुळेच अशापद्धतीच्या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून हे पुरुष आपलं म्हणणं समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. २०१२ साली स्थापन झालेल्या ‘पत्नीपीडित पुरुष आघाडी’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला. पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना अशी ओळख या संस्थेमार्फत सांगितली जाते
२०१७ पासून दरवर्षी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी हे पुरुष पिंपळपौर्णिमा साजरी करतात. वाळुंजमध्ये या संस्थेनं एक आश्रम सुरु केलं आहे. या आश्रमात राज्यभरातील पत्नीपीडित पुरुष वास्तव्यास असल्याचं संस्थेमार्फत सांगितलं जातंय. पत्नीकडून मारहाण होणारे, पत्नीमुळे मानसिक छळ होणारे पुरुष या आश्रमात एकत्र जमून पिंपळपौर्णिमा साजरी करतात. महिलांसाठी अनेक कायदे आहेत. त्यांच्यावरील अत्याचारांना त्यांना वाचा फोडता येते. पोलीस किंवा न्यायालय त्यांना मदत करते. मात्र ज्या पुरुषांना पत्नीकडून वारंवार त्रास होतो, सासरवाडीच्या लोकांकडून त्रास दिला जातो, अशा पुरुषांचं कोणी ऐकून घेत नाही, अशी या आश्रमातील पत्नीपीडित पुरुषांची खंत आहे.
“मोठ्या आशेने आम्ही लग्न करतो. नंतर संसारामध्ये भांडणं होतात. ही भांडणं जेव्हा पोलीस स्थानकापर्यंत जातात तेव्हा पोलीस आम्हाला मदत करत नाहीत. पोलीस मदत करत नाहीत पण समाजही आम्हाला मदत करताना दिसत नाही. समाजाकडूनही आम्हाला नाकारण्यात आल्यावर न्यायव्यवस्थेकडूनही आम्हाला महिलांप्रमाणे मदत केली जात नाही,” असं या आश्रमातील एका पत्नीपीडित पुरुषाने ‘एका वृत्तसंस्थेशी’शी बोलताना सांगितलं.
पत्नी आमच्याकडे सुखाने नांदत पण नाही. तसेच नांदली तर सुखाने जगू देत नाही, अशी खंत या पुरुषांनी व्यक्त केलीय. “प्रथा परंपरा पाहिल्या तर असं सांगितलं जातं की वटसावित्री जी होती त्यांनी पत्नीला मरणाच्या दारातून यमराजाकडून परत आणलं होतं. उद्या जाऊन आमच्या पत्नी वटसावित्री साजरी करतील. त्या यमराजाला साकडं घालतील की पुन्हा सात जन्मी त्रास द्यायला हाच पती दे म्हणून. पण आम्ही सात जन्म काय आता सात सेकंदही अशी पत्नी सहन करु शकत नाही, कारण या वेदना आम्हाला सहन होत नाही,” असं एका पत्नीपीडित पुरुषाने म्हटलंय. पिंपळामध्ये मुंज असतो असं म्हणतात. आम्ही त्या मुंजाला प्रार्थना करतो की आमच्या पत्नीने आमचा पिच्छा सोडावा, असंही येथे पिंपळाला उलट्या फेऱ्या मारणाऱ्या पुरुषांनी सांगितलं.