सातारा (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं ते म्हणाले. विशेष म्हणजे आंदोलन करून काय होणार, आपल्या लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, अशी आक्रमक भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.
उदयनराजे म्हणाले, “ आमचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल यात कुठल्याही जाती धर्माचे असतील तर ते त्यांना लागू होतं ना? का मराठा सोडून सर्वांना लागू करताय व मराठ्यांना बाजूला करत आहात. कोण सहन करणार आहे? जरी हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असला, तरी राज्य शासनाने आता जे आहे त्यांना आमदार व खासदार म्हणून निवडून दिलं आहे, त्यांची ही नैतिक जबाबदारी नाही का? विविध पक्षातील जे ज्येष्ठ लोकं आहेत, ते का त्यावर भाष्य करत नाहीत? का त्यांची अजूनपर्यंत यावर एकही प्रतिक्रिया आलेली नाही? लोकं म्हणतात आम्ही आंदोलन करू, मी म्हणालो आंदोलन करू नका, तुमच्या भागातील जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेले आहेत, आमदार असतील नाहीतर खासदार कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, घ्या समोर त्यांना अडवा, घरातीतुन बाहेर पडू देऊ नका, उत्तर द्यायला लावा त्यांना बोलतं करा. काय केलं तुम्ही असा जाब विचारा.”
राज्य व केंद्र सरकार आर्थिक दृष्ट्या दुर्बल सगळ्यांना आरक्षण लागू करते मग मराठ्यांना बाजूला सारून हे आरक्षण सहन करणार नाही .जरी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला असला तरीही राज्यातील आमदार-खासदारांची ही आरक्षण देण्याची नैतिक जबाबदारी आहे. जे जे जेष्ठ लोक इतर पक्षात आहेत त्यांनीही या वर बोलायला हवे. परंतु त्यांनी ही प्रतिक्रिया दिली नाही. मी म्हणजे समाज आहे असे स्वतःला मानणाऱ्या अनेकांनी निकालाकर प्रतिक्रिया दिलेली नाही. ते गप्प आहेत. मी म्हणजे समाज असे वागणाऱ्या त्या सगळ्यांची मस्ती उतरवली पाहिजे असेही उदयनराजेंनी यावेळी म्हटले.
या मुद्द्यावरून एकमेकांकडे बोटं दाखवून आता समस्या सुटणार नाही असंही उदयनराजे म्हणाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं केलेला कायदा रद्द करत सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं. त्यानंतर विविध क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. उदयनराजेंनीही अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत थेट मराठा तरुणांना लोकप्रतिनिधींना घेराव घालण्याचा जणू आदेशच दिलाय. त्यामुळं आता या प्रकरणावर भविष्यात नेमक्या कशा घडामोडी घडणार हे पाहावं लागेल.