मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप लक्षात घेऊन त्यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार बनवू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी राज्यपाल भगतसिंग यांना निवेदन दिले आहे.
राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून विधान परिषदेवर खडसेंची राष्ट्रवादीतर्फे वर्णी लागण्याची चर्चा आहे. त्यांचं नाव आमदारकीसाठी निश्चित मानलं जात आहे. मात्र, भाजप सोडताना खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर प्रचंड तोंडसुख घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर, खडसे आणि दमानिया यांच्यातील वाद अद्यापही सुरूच असलेला पाहायला मिळतो. “खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये”, अशी मागणी दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता खडसेंची संभाव्य आमदारकी धोक्यात येणार का ? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
एकनाथ खडसेंनी भाजपमधून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह अंजली दमानिया यांच्यावर खडसेंनी अत्यंत गंभीर आरोप केले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी प्रवेशदरम्यानही खडसेंनी टोकाची टीका केलीच. याच पार्श्वभूमीवर, “खडसेंना राज्यपाल नियुक्त आमदार करु नये. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीत प्रवेशदरम्यान वापरलेली टोकाची भाषा या सर्व गोष्टी लक्षात त्यांना आमदार करु नये”, असे निवेदन अंजली दमानिया यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केले आहे.