पुणे (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस हे जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत, असे वाटले होते. मात्र, त्यांनी आज जे बेजबाबदारपणे विधाने केली आहे. ते भडकवत असल्यासारखे वाटले. हिंदू-मुस्लिम करू नका. फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत असून त्यांनी पूर्ण अभ्यास करावा. असा टोला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना लगावला आहे.
अमरावती हिंसेच्या घटनेवरून विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर केलेल्या टीकेला ठाकूर यांनी फडणवीसांची पत्रकारपरिषद संपताच मीडियाशी संवाद साधत त्यांना प्रत्यूत्तर दिले आहे. रजा अकादमीचा फायदा कोणाला होतो, ते देशाला माहीत आहे. हिंसाचाराबाबत गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत. कोणाच्याही आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. कोणीही राजकीय भाषा अमरावतीत करू नये. अमरावती आता शांत झालेली आहे. आम्हाला ती शांत ठेवायची आहे, असे महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
त्रिपुरा येथील कथित प्रकरणानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. यात अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी अमरावतीतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्य सरकारवर व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेवर यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिलं आहे.