पुणे (वृत्तसंस्था) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या, की वेगवेगळ्या? याचा निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील. त्यामुळे कोणीही डोकी खाजवत विचार करत बसू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रचारार्थ बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पवार बोलत होते. यावेळी राज्याचे मंत्री दिलीप वाळसेपाटील, पदवीधरचे उमेदवार अरुण लाड, शिक्षक मतदार संघांचे उमेदवार जयंत आसगावकर, खासदार अमोल कोल्हे, ऍड. वंदना चव्हाण, प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहर अध्यक्ष व आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिका विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ, नगरसेवक दीपक मानकर, रवींद्र माळवदकर यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. शिवसेना आणि कॉंग्रेसला बरोबर घेऊन त्यांचा मानसन्मान ठेवा. ही निवडणूक झाल्यावर आपल्याला 2022 च्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागायचे आहे. मधल्या काळात एक लाट आली आणि त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी आणि हडपसर या मतदारसंघात आपल्याला यश आले, तर खडकवासला मतदारसंघात थोडक्यात संधी हुकली. जोपर्यंत कार्यकर्ता पदावर बसत नाही, तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत काही अनुभवी उमेदवारांसह तरुणांना संधी देणार आहे. त्यामुळे वॉर्ड कसे होतील, त्याकडे जास्त लक्ष न देता पक्ष बांधणीला सुरुवात करा. येत्या काही दिवसांत संघटना स्तरावर काही बदल केले जातील, असे संकेत पवार यांनी यावेळी दिले.
शहरात दोन रिंगरोडचे प्रस्ताव
राज्यावर करोना, अतिवृष्टी, चक्रीवादळ असे एकामागोमाग संकटे आली. मात्र, सरकारने त्यावर मात केली. पुण्यात दोन रिंगरोड प्रस्तावित आहेत. मेट्रोचे काम सुरू असून, लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येईल. चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, त्यावरही मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.