जळगाव (परशुराम माळी) समता, बंधूता, एकता, सर्व धर्म सहिष्णूता, धर्म निरपेक्षता या तत्वावर आधारित भारतीय समाज व्यवस्थेचे स्वप्न पाहणारे आणि ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा… शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी समाजाला दिला. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा खरा अपराधी असतो असे बाबासाहेबांचे मत होते.
पिढ्यान पिढ्या दबलेल्या न्याय , हक्क अधिकारापासून वंचित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा आणि त्यांना हक्क अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला.
बाबासाहेब खुपच खडतर आणि हालाखिच्या परिस्थितीतून शिकले, मोठे झाले. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा त्यांचा संघर्ष शब्दात व्यक्त करण्या पलीकडचा आहे. त्या काळामध्ये शिक्षणाची मक्तेदारी विशिष्ट वर्गाच्या हातात होती, बहुजन मागास वर्गातील लोकांना त्यावेळी शिक्षणाचा अधिकार नव्हता… त्यांच्या शिक्षण घेण्याला उच्च समजल्या जाणाऱ्या वर्गाकडून विरोध केला जात असे… पण या सर्व विरोधाला तोंड देऊन अन्यायाचा प्रतिकार करून बाबासाहेब शिकले त्यांनी संघर्ष केला.
बाबासाहेब लढवय्ये होते त्यांनी आयुष्यभर लढा दिला. अनेकवेळा बाबासाहेबांना अपमानित करण्यात आले पण तो अपमान त्यांनी मोठ्या मनाने गिळला अपमान करणाऱ्यांना त्यांनी कृतीतून उत्तर दिले. जाती – धर्म भेदांचा सामना क्षणोक्षणी करावा लागलेले बाबासाहेब मनाने मजबूत होत गेले. समाजातील प्रत्येकाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे यासाठी त्यांनी जाती – धर्म भेदा विरुद्ध आवाज उठवला…
माणुस जाती आणि धर्मावरून नाही तर त्याच्या कर्तूत्वा वरून ओळखला जावा यासाठी त्यांनी लढा दिला. प्रगल्भ बुध्दीमता, चातुर्य याच्या बळावर त्यांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. जिद्द , धैर्य, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.
बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड होती. एका बैठकीत बाबासाहेब खंडच्या खंड वाचून काढत असत. बाबासाहेबांची एकाग्रता प्रचंड होती. बाबासाहेबांनी विरोधकांना त्यांच्या बुध्दीचातूर्याने उत्तर दिले.
शेवटी एवढंच म्हणेन की, वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या बाबासाहेबांनी बलशाली भारताची राज्यघटना लिहिली. त्यासाठी असावी लागते संघर्षामध्ये धमक आणि प्रभावी इच्छाशक्ती ती फक्त बाबासाहेबांमध्ये होती… आज गरज आहे या विचारांना पुढे घेऊन जाण्याची समाज बदलाची.
अजूनही समाजाची मानसिकता बदललेली नाही. जाती आणि धर्म भेदाच्या विळख्यात समाज अडकलेला आहे. आणि हे बदलने गरजेचे आहे. जो पर्यंत जातीभेद आणि धर्म भेदांचे पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून ओळखले जाणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत सत्यात उतरणार नाही… आणि ही जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे… अन्यथा येणाऱ्या अनेक पिढ्या जाती भेदांच्या विळख्यात अडकून बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत… हे वेळीच रोखणे गरजेचे आहे.
शिक्षण हे वाघीणीच दूध आहे आणि ते दूध जो प्राशन करेल तोच जग जिंकेल असे बाबासाहेब नेहमी सांगायचे.
सहनशीलता हा बाबासाहेबांचा सर्वात मोठा गूण होता. त्यांच्याजवळ असलेल्या सहनशीलतेमुळेच बाबासाहेब मोठे झाले जगाला आदर्शवत असे व्यक्तीमत्व आकाराला आले. या महामानवला कोटी कोटी अभिवादन !
©परशुराम माळी
शिक्षक
अनुभूती स्कूल, जळगाव.
parashuram.mali1121@gmail.com
8830493401
7588663662