मुंबई (वृत्तसंस्था) शासकीय कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सरकारने जाहीर केले आहे.
आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेसकोडबाबत नवे नियम ठरवले आहेत. मंत्रालयात आता जिन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही. शिवाय गडद रंगाचे चित्रविचित्र कपडे घालण्यास राज्य सरकारकडून मनाई घालण्यात आली आहे. मंत्रालयातून राज्य सरकारचा कारभार चालविण्यात येतो. लोकप्रतिनीधी, सर्वसामान्य नागरिक, अधिकारी हे त्यांच्या कामासाठी कार्यालयाला भेट देतात. अशा वेळी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्माचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. तसेच कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना सरकारी कर्मचारी अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होते. शासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. या परिस्थितीत जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.