जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा गावाजवळ महामार्गावर आज दुपारी झालेल्या विचित्र अपघातात तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कार चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून जळगावकडे ( क्रमांक एम.एच १२ क्युएफ १२५२) ही कार येत होती. यावेळी अचानकपणे चालकास हृदयविकाराचा झटका आला. यानंतर चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्यामुळे समोर चालत असलेल्या दोन पादचाऱ्यांसह दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात तिन जण जखमी झाले. विशेष म्हणजे कार पुढे चालतच राहिली. अखेर पुढे धावत असलेल्या (एम.एच १४ डी.एन ९८४३) या कारला धडक लागल्यामुळे कार थांबली.
या अपघातामुळे रस्त्यावरील नागरीक कार चालकावर प्रचंड संतापले. त्याची कार थांबताच जमावाने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या भरत सुतार यांच्या लक्षात आले की, कारचालकास हृदयविकाराचा झटका आहे. सुतार यांनी संतप्त जमावाची समजुत काढली आणि अत्यवस्थ असलेल्या कारचालकास रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलविले. दरम्यान, शेवटचे वृत्त आलेतोपर्यंत अपघातातील जखमी व हृदय विकाराचा झटका आलेल्या कारचालकाचे नाव समजू शकले नव्हते.