श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मूमधील एअरबेसवर रविवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पुन्हा सोमवारी पहाटे तीन वाजता मिलिट्री स्टेशनवर ड्रोन आढळून आले. लष्काराच्या निदर्शनास येताच त्यांनी २० ते २५ राऊंडची फायरिंग केली. त्यानंतर हे ड्रोन गायब झालेत.
जम्मूमध्ये आज सैन्य तळावर ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या कालूचक मिलिटरी स्टेशनवर पहाटे ३.०० वाजल्याच्या सुमारास दोन संशयास्पद ड्रोन आढळून आले. जवान अलर्टवर असताना ड्रोन दिसताच त्यांनी त्यावर २०-२५ राऊंड फायर केले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पहिला ड्रोन रात्री ११.४५ मिनिटांनी तर दुसरा ड्रोन २.४० मिनिटांनी दिसून आला. भारतीय सैन्याकडून फायरिंग करण्यात आल्यानंतर हे ड्रोन दिसेनासे झाले. सध्या भारतीय सैन्याकडून बेपत्ता ड्रोनची माहिती घेण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एनएसजी टीम ताबडतोब जम्मूमध्ये दाखल झाली होती. टीमजवळ अँटी ड्रोन गन्स आहेत, याचा वापर ड्रोन पाडण्यासाठी केला जातो.
ड्रोनचा वापर कसा झाला ?
काही दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा यंत्रणांना जैश ए मोहम्मदने हिज्बुल मुजाहिदीनची मदत घेत पाकिस्तानमधून भारतात छुप्या पद्धतीने ड्रोन आणल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी ५ ते ६ किलो वजनाचा एक आयईडीदेखील पोलिसांनी जप्त केला होता. दरम्यानच्या काळात छुप्या मार्गाने जम्मू काश्मीर परिसरात ड्रोन बनवण्याचं सुट्टं साहित्य आणून त्याचा वापर हा हल्ल्यासाठी केला असावा, असा संशय जम्मू काश्मीर पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस सध्या त्या दिशेने तपास करत आहेत.