नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कादिमी यांच्या निवासस्थानावर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला. रविवारी सकाळी हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, इराकचे पंतप्रधान या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. इराकी लष्कराने हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असलेले ६ जवान जखमी झाले.
बगदादच्या ग्रीन झोनमधील पंतप्रधानांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. या झोनमध्ये अनेक सरकारी इमारती आणि परदेशी दूतावास असल्याची माहिती आहे. कदिमी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. दोन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कादिमीच्या घरावर किमान एक हल्ला झाला. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर सुरक्षेत तैनात असलेले ६ जवान जखमी झाले आहेत. ग्रीन झोनमधील पाश्चात्य मुत्सद्दींनी सांगितले की त्यांनी स्फोट आणि बंदुकीच्या गोळ्याचा आवाज ऐकला.
लोकसभा निवडणुकीत हेराफेरीचा आरोप
इराकच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा देशात गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेराफेरीचे आरोप झाले आहेत. शुक्रवारीच बगदादच्या ग्रीन झोन क्षेत्राबाहेर तळ ठोकलेल्या इराणी समर्थक शिया सैनिकांच्या समर्थकांमध्ये आणि दंगलविरोधी पोलिसांमध्ये संघर्ष झाला, जो नंतर हिंसक बनला. या घटनेत एक आंदोलक ठार झाला आणि अनेक लोक जखमी झाले, यामध्ये बहुतांश बहुतेक इराकी सुरक्षा दलांचे सदस्य होते. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव नाकारला आहे. इराण समर्थक सेनानींना निवडणुकीत सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.















