जळगाव (प्रतिनिधी) जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने रावेर शहरातून अंमली पदार्थ जप्त केल्याचे वृत्त आहे. परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक केली असून संशयीताकडे प्रतिबंधीत ड्रग्ज ब्राऊन शुगर असल्याची दाट शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात ब्राऊन शुगर प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथे पर राज्यातून अंमली पदार्थ आणले जाणार असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानुसार त्यांच्यासह पथकाने सकाळी सापळा रचला होता. माहितीनुसार संशयीत आल्यानंतर पथकाने त्यांच्याकडील कोट्यवधी रुपये किंमतीची ब्राऊन शुगर जप्त केली आहे. पोलीस यंत्रणेकडून जप्त ब्राऊन शुगरची मोजणी सुरू असून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत रावेर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. जळगाव जिल्हा अंमली पदार्थ तस्करीचा अड्डाच आहे कि काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.