चेन्नई (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी तमिळनाडु दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मस्तीच्या मूडमध्ये दिसले. राज्यातील मुलागुमूदुमधील सेंट जोसेफ मॅट्रिकुलेशन हाययर सेकेंडरी स्कूलमध्ये राहुल गांधींनी आधी विद्यार्थ्यांसोबत डान्स केला, नंतर विद्यार्थ्यांना अकिडोची ट्रेनिंग दिली. यावेळी त्यांनी अवघ्या ९ सेकंदात १३ पुशअप्स मारून आपला फिटनेसचा दमही दाखवून दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकांची जशी चर्चा होते तशीच त्यांच्या फिटनेसचीही नेहमीच चर्चा होत असते. राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून या ठिकाणीही त्यांच्या फिटनेसची पुन्हा एकदा चर्चा रंगली. केवळ फिटनेसची चर्चाच रंगली नाही तर राहुल यांनी अवघ्या ९ सेकंदात १३ पुशअप्स मारून आपला फिटनेसचा दमही दाखवून दिला. निमित्त होतं एका शाळेतील कार्यक्रमाचं. राहुल गांधी हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी कन्याकुमारी येथे रोड शो केला. त्यानंतर त्यांनी एका शाळेत येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी गप्पा मारता मारता त्यांनी आयकिदो हा मार्शल आर्टचा प्रकार विद्यार्थ्यांना करून दाखवला. त्यानंतर मेरोलिन शेनिघा नावाच्या विद्यार्थ्यीनीने त्यांना पुशअप मारण्याची विनंती केली. राहुल गांधी यांनीही मागे पुढे न पाहता तात्काळ पुशअप्स मारण्यास सुरुवात केली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी दक्षिणेवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये ते वारंवार दौरा करत आहेत. पुद्दुचेरी , केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेतील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे या राज्यांवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यातही त्यांनी केरळवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.