मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुसलमान बांधवांना डोकं शांत ठेवण्यासाठी पानसुपारी, पानमसाला खाण्याचा अजब सल्ला दिला. जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम बांधवांना विनंती करत तोंडात पान, सुपारी, पानमसाला जे हवं ते ठेवा परंतू डोकं शांत ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.
शुक्रवारी भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आव्हाड यांनी म्हटले आहे की, मी मुस्लीम बांधवांना विनंती करतो की, त्यांनी शांत राहावे, डोके गरम करून घेऊ नये. विरोधकांना तुमची डोके भडकवयाची आहेत. त्यामध्ये त्यांचा मोठा राजकीय स्वार्थ आहे. पण तुम्ही शांत रहा. डोके थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा, तोंडात रजनीगंधा, गुटखा, पानमसाला हवे ते ठेवा, मात्र शांत रहा असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि पंतप्रधान मोदींच्या १५ लाखांच्या घोषणेवरूनही त्यांनी भाजपावर निशाणा साधला. आपण हे लक्षात घ्यायला हवे की देशात महागाई उच्चस्थरावर आहे, पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. भाजपाची सत्ता आल्यास देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, अशी घोषणा मोदींनी केली होती. मग आता त्या घोषणेचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.