पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं ब्राह्मण संघाने म्हटलं आहे. यावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर ब्राम्हण महासंघाने जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाली.
ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते गुरुजींच्या वेशात आले होते. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचं दिसताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यातूनच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले हास्य आवरले नाही. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही. भाषणात मी अपशब्द वापरले नाहीत.