मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. १०० कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत ४.२० कोटी रुपये इतकी आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला. यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे.
















