मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून छापेमारी सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या कारवाईवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. ‘हे काही नवीन नाही. अनिल देशमुखांच्या आधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर झाला आहे. त्याची आम्हाला चिंता वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
“ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
“जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील यापूर्वी आपण कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
अनिल देशमुखांचे स्वीय सहाय्यक ईडीच्या ताब्यात
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एकूणच संपूर्ण प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.