ठाणे (वृत्तसंस्था) प्रताप सरनाईकचं तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे, अशा शब्दात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.
ईडीचे लोक माझ्या मुलांना तुमचे वडील कंगना, अर्णब, अन्वय नाईक प्रकरणावर खूप बोलत असल्याचे विचारत होते. या देशात, राज्यात महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी होत असेल तर अशा गोष्टींवर प्रताप सरनाईक बोलणार. प्रताप सरनाईकचे तोंड ईडीची धाड पडली म्हणून बंद होणार नाही. या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची तयारी आहे. मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलेलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना अशा ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले तरी समोर जाण्याची तयारी आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. ईडीच्या लोकांनी माझं ऑफिस, घरी सगळीकडे चौकशी केली, कागदपत्रं ताब्यात घेतली. मी गेल्या ३० वर्षांपासून बांधकाम आणि हॉटेल व्यवसायात आहे. त्याची रितसर कागदपत्रं आहेत. ईडीच्या लोकांना माझे कर्मचारी, मुलं यांनी माहिती दिली आहे. त्यातही त्यांचे समाधान झाले नाही. ज्यावेळी ते मला बोलावतील प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. मी त्यांच्या प्रश्नानां उत्तर देण्यात समर्थ आहे, असेही सरनाईकांनी म्हटले आहे.