पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) अवघ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन प्रयत्न करणार आहे. तसेच जळगावात भव्य-दिव्य वारकरी भवन लवकरच उभं करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केली. ते तालुक्यातील पाळधी येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने आयोजित खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळ्यात बोलत होते.
खान्देश विभागस्तरीय विचारविनिमय व पदनियुक्ती सोहळ्यात वारकऱ्यांशी निगडित समस्या, अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. सोहळ्यात विचार मंथन सोहळ्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. त्यात विविध प्रकारच्या विषयांवर मंथन झाले. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वच क्षेत्रांसह हरिपाठ, कीर्तन तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांवर बंदी आली. त्यामुळे वारकऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतू आता राज्य सरकारच्यावतीने टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंदिरे, धार्मिकस्थळे उघडण्यात यावीत. तसेच हरिपाठ, कीर्तन तसेच समाजप्रबोधनपर कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने करण्यात आली.
दुसरीकडे ना. पाटील यांनी वारकरी समुदायाने संघटीत झाले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन उभं राहिलं पाहिजे. या भवनात हॉस्टेल, अभ्यास कक्ष असले पाहिजे. याठिकाणी बाहेरगावच्या कीर्तनकारांना थांबण्याची उत्तम सोय राहिले पाहिजे. कीर्तनकारांनी एकत्र आले पाहिजे. कीर्तनकारांना ठरवले तर कोणत्याही सरकारची सत्ता उलथवू शकतात. राज्यातील सर्व कीर्तनकारांचा विमा काढला पाहिजे, असेही ना. पाटील म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे,पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील वारकरी समुदायाचे मान्यवर उपस्थित होते.