मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील करोनाचे संकट जरी ओसरल्याचे दिसत असले, तरी देखील आता ‘ओमायक्रॉन’ रूपी संकट डोकं वर काढत आहे. राज्यात आज दिवसभरात आणखी ८ रूग्ण ‘ओमायक्रॉन’ बाधित आढळले आहेत. तर, आजपर्यंत राज्यात एकूण ४८ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
राज्यात आज सापडलेल्या एकूण ८ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे मुंबई विमानतळ कार्यक्षेत्रातील तीन रुग्ण सातारा तर एक रुग्ण पुण्यातील असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. इतर तीन रुग्ण हे छत्तीसगड, केरळ आणि जळगावचा रहिवासी आहेत. साताऱ्यातील ३ जणांनी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास केला होता. या तीन जणांपैकी एक रुग्ण ८ वर्षाची मुलगी आहे. ओमिक्रॉनची बाधा झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढताना पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत २८ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे आज पुन्हा एकदा मुंबईत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मार्च – २०२० मध्ये कोविड-१९ चा प्रसार सुरु झाल्यानंतर यापू्र्वी १७ ऑक्टोबर २०२१ ला पहिल्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या डिसेंबर महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. या महिन्यात यापूर्वी ११ डिसेंबर आणि १५ डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झालेली होती.