जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीपेठ शाखेची ऐतिहासिक “दगडी बँक” म्हणून ओळखली जाणारी इमारत विक्रीस काढण्याच्या हालचालींना विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात त्यांनी बँकेच्या चेअरमन यांना लेखी निवेदन पाठवून विक्रीचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
खडसे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, नवीपेठ शाखेची इमारत जुनी झाल्याने तिचा काही भाग वापरात नाही. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत विषय क्रमांक २४ अंतर्गत ही इमारत विक्रीसंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. गव्हर्मेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर यांच्या अहवालावर आधारित हा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
मात्र, ही इमारत ब्रिटिश काळातील असून दगडात उभारल्यामुळे ती “दगडी बँक” म्हणून प्रसिद्ध आहे. तत्कालीन संचालक मंडळाने १९२७ मध्ये मुख्य बाजारपेठेतील ही वास्तू विकत घेतली होती. जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भावना या इमारतीशी निगडीत आहेत. शेतकऱ्यांच्या परिश्रमातून व तत्कालीन संचालक मंडळाच्या दूरदृष्टीतून उभारलेला हा वारसा असलेला ठेवा विकण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारा ठरेल, असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे या निर्णयाला तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत जिल्हा बँकेला मालमत्ता विकण्याची कुठलीही आवश्यकता नाही. त्यामुळे या “हेरीटेज बिल्डिंग” विक्रीस आपला ठाम विरोध नोंदवित असून बँकेच्या संचालक मंडळाने हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, जेष्ठ बंधु डॉ. बी. जी. खडसे यांच्या निधनामुळे ते १ ऑक्टोबर रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेस उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे या पत्राद्वारेच आपली भूमिका स्पष्ट करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.















