जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, खडसे यांच्या फोन बंद येत असल्यामुळे याबाबत संभ्रम कायम आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीनंतर पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे खडसे पक्षांतर करणार असल्याचे स्पष्ट झालेय. सरकारनामा पोर्टलने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. सरकारनामाच्या बातमी नुसार खडसे यांचा पक्षप्रवेश येत्या गुरुवारी होत असल्याचे त्यांच्याच निकटवर्तीयांनी सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे. एवढेच नव्हे तर खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविल्याचेही म्हटले आहे. गुरुवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश निश्चित झाला असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.