भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे जुन्या वादातून वृद्धाचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या २४ तासात गुन्ह्याची उकल करत संशयित आरोपी लक्ष्मण गणेश शिराळे (रा. शेलवड) अटक देखी केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, सदाशिव राजाराम डहाके (वय ७५, रा. पिशर, ता. कन्नड, जि. संभाजीनगर) हे कुऱ्हे येथे महिना भरापासून अण्णा शिंदे यांच्या शेतात देखरेखीचे काम करीत होते. त्यांचे कुऱ्हे पानाचे येथे खळयामध्ये वास्तव्य होते. दि. १४ रोजी सांयकाळी दीपक पिंताबर पाटील हे सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या खळयाच्या बाजूला असलेल्या अन्ना शिंदे यांच्या खळयामध्ये म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले असताना त्यांना सदाशिव राजाराम डहाके हे पंलगावर झोपलेले दिसले. त्यांनी त्यांना आवाज देऊन उठवले असता ते उठले नाहीत. ते मृत झाल्याचे लक्षात आल्याने दीपक पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र, शवविच्छेदनात मृतास विविध ठिकाणी अंतर्गत जखमा असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय प्राप्त झाला. यानंतर दूध विक्रेता अनिल संतोष धनगर (रा. मोढाळे, ता. भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस तपासात लक्ष्मण गणेश शिराळे (रा. शेलवड) याने जुन्या वादातून खून केला असून तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्याला शिताफीने मोढाळा येथून अटक केली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. मेहश्वर रेड्डी यांच्या मार्गदशनाखाली अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन जगताप, स. फौ. विठ्ठल फुसे, सपोनि अमोल पवार, पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे, पोहेकों संजय तायडे, युनुस शेख, प्रेमचंद सपकाळे, दीपक जाधव, वाल्मीक सोनवणे, आत्माराम भालेराव, रियाजोद्दीन काझी, पोना कैलास बाविस्कर, जितेद्र साळुंखे, पोकॉ उमेश बारी, रशिद तडवी यांनी केली.