जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशनवर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ६३ वर्षीय वयोवृद्ध नागरिकाचे जीआरपी पोलिसांनी मनपरिवर्तन करीत त्याला घराकडे रवाना केले. पत्नीच्या जाचाला कंटाळून वृद्ध व्यक्ती आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते.
शहरातील खोटे नगरातील रहिवासी पुंडलिक (नाव बदललेले) हे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास स्टेशनवर आले होते. यावेळी रेल्वे लोहमार्ग विभागाचे पोलीस हवालदार सचिन भावसार व किशोर पाटील हे स्टेशनवर गस्त घालत होते. यावेळी त्यांना हे वृद्ध पार्सल कार्यालयाजवळील रेल्वे रुळाजवळ भर उन्हात डोक्याला हात लावून बसलेले आढळून आले. यावेळी सचिन भावसार यांनी या वृद्ध व्यक्तीजवळ चौकशी केली असता त्यांनी जोरजोराने रडायला सुरुवात केली. घरात पत्नी दररोज वाद घालत असल्यामुळे आता जगायचे नसल्याचे सांगत पत्नीकडून होणाऱ्या त्रासाची आपबिती कथन केली. यानंतर पोलिसांनी या वृद्धाला पोलीस स्टेशनमध्ये आणून समजूत घातली. तसेच त्यांच्या पत्नीलाही पोलीस ठाण्यात बोलावून पतीला त्रास न देण्याची ताकीद देऊन घराकडे रवाना केले.