अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे येथील वृद्धास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल व्हावा यासाठी मयत पांडुरंग शिवराम पाटील यांच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट अमळनेर पोलीस ठाण्यात आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील सारबेटे येथे १२ जानेवारीला पांडुरंग शिवराम पाटील (वय-५४) यांचे तेजस विजय पाटील यांच्या सोबत गावातील ग्रामपंचायत जवळ भांडण झाले. त्यात तेजसने पांडुरंग पाटील यांना विनाकारण दारूच्या नशेत जबर मारहाण केली होती. ही बाब अपमानास्पद वाटल्याने त्यांनी सायंकाळी सहा वाजता विषप्राशन केले. यानंतर पांडुरंग शिवराम पाटील यांना धुळे येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १३ जानेवारी रोजी सकाळी त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. आपल्या वडिलांच्या आत्महत्येस तेजस जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे पुत्र योगेश पाटील यांनी केला. तसेच तेजसविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून पांडुरंग पाटील यांचा मृतदेह अमळनेर पोलीस ठाण्यात बाहेर आणला. यानंतर तेजस पाटीलविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.