चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील हिरापूर येथे धक्कादायक प्रकार घडला असून मद्याच्या नशेत मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना २० डिसेंबरला घडली.
या प्रकरणी जखमी आई कमलबाई लहु काळे (वय ७०) यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून मुलगा हेमंत लहु काळे व एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलबाई काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, हेमंत काळे हा मद्य प्राशन करुन एका अनोळखी व्यक्तीसोबत घरी आला. त्याने वडिलांना रॉकेल टाकून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच पेट्रोल आणून घरात आगपेटी शोधू लागला. त्यावेळी कमलबाईंनी आरडाओरडा केली असता कुणीही मदतीला आले नाही. त्यानंतर हेमंतने घरातील खुर्ची व हातातील कड्याने कमलबाईंच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वडिलांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच कमलबाई यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्या बेशुद्ध पडल्यात. या घटनेनंतर नातेवाईकांनी दोघांना त्यांच्या तावडीतून सोडवून प्रथम चाळीसगाव येथील रुग्णालयात नेले.














