रावेर (प्रतिनिधी) येथील बस स्थानकातून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला भूलथापा देवून ४ ग्रॅमची सोन्याची पोत घेऊन अज्ञात महिलेने पोबारा केल्याची घटना दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात ग.भा. वसंताबाई रामदास पानपाटील (वय ७०,व्य. घरकाम रा. धाबेपिंप्री ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, अज्ञात एक अनोळखी बाई तिच्या डोक्यावर पांढ-या रंगाचा स्कार्प वय अंदाजे ४०-४५ वर्ष वर्षीय हिने वसंताबाई यांच्यासोबत जवळच्या नातेवाईकांची ओळख दाखवून गप्पा गोष्टी सुरु करून जवळीकता साधली. त्यानंतर सांगितले की, मी वयोवृद्ध माणसांसाठी पगार सुरु होण्यासाठी शासनाची नवीन योजनेचा लाभ मिळवून देते, असे सांगून पगार सुरु करुन देण्याची बतावणी केली. यानंतर माझी सोन्याची माळ घरी राहून गेली आहे. तहसील कार्यालयात मंगळसूत्र घातलेला फोटो लागतो. त्यामुळे तुम्ही मला थोड्या वेळीपुरती तुमच्या गळ्यातील माळ द्या, असे भूलथाप देवून वसंताबाई यांच्या गळ्यात घातलेली ४ ग्रॅम सोन्याची सोन्याची पोत व आधारकार्ड घेऊन मी तहसिल कार्यालयात जावुन येते असे सांगून पोबारा केला. याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख हे करीत आहेत.