जळगाव / नशिराबाद ( प्रतिनिधी ) : निवडणुकीच्या वादातून गेल्या पंधरा दिवसांपासून नशिराबादमध्ये दोन गटात धूसफूस सुरु होती. याच वादातून रविवारी दुपारच्या सुमारास दोन्ही गट समोरासमोर आले आणि त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली यामध्ये घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या तर वाहनांची देखील नुकसान झाले आहे. यावेळी लाठ्याकाठ्यांसह लोखंडी पाईप व कुऱ्हाडीने वार केल्यामुळे १६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
नशिराबाद नगर पालिकेची निवडणुक गेल्या पंधरा दिवसांपुर्वी पार पडली. या निवडणुकीच्या वादातून दोन गटात धुसफूस सुरु होती. गेल्या चार ते पाच दिवसांपुर्वी एका गटाकडून दुसऱ्या गटातील तरुणांना मारहाण करुन जखमी केले होते, दरम्यान, रविवार दि. १७ रोजी इस्लामपुरा भागातील रहिवाशी आरीफ अली यांच्या घरी रविवारी न्याजचा (गोडभाताचा भंडारा) कार्यक्रम आयोजित केलेला होता. दुपारी जुन्या भांडणाच्या कारणावरून दुसऱ्या गटातील सुमारे दीडशे ते दोनशे जणांच्या गटाने अचानक दगडफेक करण्यासह लोखंडी पाईप, लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने हल्ला केला.
गावात ऊरुसवेळी झाले होते वाद
नशिराबाद येथील या हाणामारीसह दगडफेकीच्या घटनेला नगरपालिका निवडणूक व त्यानंतर गावातील ऊरसवेळी झालेल्या वादाचीही किनार आहे. हे गट शुल्लक कारणावरुन एकमेकांना भिडत असून त्यांच्यातीलवाद आणखीच वाढत आहे.
पोलीस ठाण्यात जमावावर लाठीचार्ज
गावात दगडफेक झाल्याचे कळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी सपोनि योगिता नारखेडे या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, त्यानंतर जखमी तात्काळ पोलिस ठाण्यात गेले. तेथे पुन्हा वाद झाला. पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे २०० ते २५० जणांचा जमाव जमा झाला. त्यामुले गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
दगडफेकीतील जखमी जमावाने केलेल्या हल्ल्यात शेख अमीन शेख बाबु (वय ४५), अब्दुल महेमूद अब्दुल गनी (वय ५६), मोईल अब्दुल रऊफ (वय २२), आकीब नवाब अब्दुल महेमुद (वय २८), रिजवान रऊफ खान (वय २८), आवेश जहांगीर शेख (वय २४), अबुजर जहाँगीर शेख (वय २०), सैय्यद नावीद सैय्यद आरिफ (वय २२), सैय्यद आसिफ सैय्यद रशीद (वय ४२), हसनैन सैय्यद आरीफ (वय १४), मुश्ताक शेख नवीद (वय १६), गुलाम मोहम्मद अली (वय २१), दानिश सैय्यद रफिक (वय २३), आरीफअली रशीद अली (वय ४७), रजिया जुल्फीकार अली (वय ४७), शेख मुस्तकीम शेख अन्वर (वय ३०) हे जखमी झाले, त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
















