वाशीम (वृत्तसंस्था) शेतात विहिरीजवळ निंदन काम करीत असताना मोटरपंपाच्या विज प्रवाह असलेल्या केबलच्या विजेच्या धक्क्याने २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिपाली ज्ञानेश्वर तहकीक असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, मदतीसाठी गेलेल्या पती ज्ञानेश्वर यांना देखील गंभीर दुखापत झाली. ही दुर्देवी घटना मुंगळा शिवारात २० जुलै रोजी घडली.
मुंगळा येथील दिपाली तहकीक, ज्ञानेश्वर तहकीक हे शेतकरी दाम्पत्य गुरुवारी त्यांच्या शेतात गेले होते. ज्ञानेश्वर शेताच्या धुऱ्यावर गुरे चारत असताना दिपाली शेतातील विहिरीजवळ निंदन, खुरपण करीत होत्या. यावेळी मोटरपंपाच्या विज प्रवाह असलेल्या केबलला त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीला विजेचा धक्का बसल्याचे बघून त्यांचे पती ज्ञानेश्वर तहकीक यांनी मदतीसाठी धाव घेत विज प्रवाह बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील विजेचा धक्का बसला. सुदैवाने त्यांचा जीव वाचला असला तरी गंभीर दुखापत झाली आहे. सदर प्रकार पाहून त्यांच्या चुलत भावाने विज प्रवाह खंडीत करुन दोघांनाही उपचारासाठी हलविले. मात्र, दिपाली यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर ज्ञानेश्वर तहकीक यांच्यावर प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. तहकिक दांपत्यास १६ महिन्याचा रुद्र नावाचा मुलगा आहे.