जळगाव (प्रतिनिधी) ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी जुलैअखेर शनिवारी व रविवारी (३० व ३१ जुलै) वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार जळगाव परिमंडलांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार व रविवारी सुरु राहतील. त्यासोबतच थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईही या दिवशी सुरू राहणार आहे.
अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा सहज उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे आदी) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरता येते. अखंडित वीजसेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.